शिवसेनेचं वागणं म्हणजे `अर्धनारीनटेश्वरा`चा प्रयोग!
भाजप विरूद्ध शिवसेना संघर्षाला आता नवं वळण लागलं आहे. सामनातून भाजपवर वारंवार होणाऱ्या टीकेला आता तरुण भारतमधून शिवसेनेवर वार सुरू झालेत.
नागपूर : भाजप विरूद्ध शिवसेना संघर्षाला आता नवं वळण लागलं आहे. सामनातून भाजपवर वारंवार होणाऱ्या टीकेला आता तरुण भारतमधून शिवसेनेवर वार सुरू झालेत. सत्तेत सहभागी असूनही मित्रपक्ष भाजपवर टीकेची झोड उडवणाऱ्या शिवसेनेवर नागपूर 'तरूण भारत'मधून तोफ डागण्यात आलीय.
नागपूर 'तरुण भारत' च्या 'उसने अवसान' नावाच्या अग्रलेखातून शिवसेनेवर कठोर टीका करण्यात आली आहे. भाजपवर शिवराळ भाषेत टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, असा सल्ला शिवसेनेला देण्यात आलाय. सत्ताही सोडायची नाही आणि सतत टीकेचा सूरही सुरु ठेवायचा असा हा 'अर्धनारीनटेश्वरा'चा प्रयोग चाललाय, असा भडीमार तरूण भारतनं केलाय.
दरम्यान, तरूण भारत कोण वाचतं? आम्ही त्यांना अजिबात किंमत देत नाही, असा प्रतिटोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी लगावलाय. उद्याच्या निवडणुकीत जनता कुणाला साडी घालायला लावील, ते चित्र स्पष्ट होईल, असं प्रत्त्युत्तर त्यांनी दिलं.