कपिल राऊत, ठाणे : खिशात रोख रक्कम नसल्यानं तुमचं काम अडलंय आणि घराच्या खाली असलेल्या एटीएमबाहेर लांबच लांब रांग आहे. त्यामुळे पैसे तात्काळ मिळण्याची सुतरामही शक्यता नाही, अशा वेळी जर तुम्हाला अचानक कुणीतरी 100 रुपयांच्या 20 नोटा हातात दिल्या तर... निश्चितच तुम्हाला आनंद होईल... आणि असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना आलाय...


'देना बँके'चा उपक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातल्या वृंदावन सोसायटीतल्या सकाळी सकाळी सुखदा धक्का मिळाला... देना बँकेचे कर्मचारी त्यांच्या सोसायटीत एटीएम घेऊनच दाखल झाले. नोटबंदीचा निर्णय आल्यानंतर देशभरात सर्वत्र बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक आपले काम सोडून या रांगांमध्ये तासनतास उभे राहत असल्याचे चित्र दिसून येतंय. या अनुषंगाने आता बँकांनी नागरिकांच्या दारात जाऊन पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


खाजगी बँकांचाही पुढाकार


देना बँकेसह काही खाजगी बँकांनी ठाण्यातील बड्या सोसायट्यांमध्ये जाऊन मायक्रो एटीएम मशीनद्वारे नागरिकांना दोन हजारपर्यंत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


पुढील दहा दिवस या सुविधेचा लाभ ठाण्यातील नागरिकांना घेता येणार आहे. नागरिकांच्या दारात जाऊन मायक्रो एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा ठाण्यात सोमवारपासून सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या सुविधेचा शुभारंभ वृंदावन सोसायटीपासून करण्यात आला. पहिल्या दिवशी जवळपास हजाराच्या वर नागरिकांनी या मायक्रो एटीएम सुविधेचा लाभ घेतला. 


बँकेने स्वतः येऊन हा उपक्रम राबवला आहे. आता सर्वच बँकांनी असा उपक्रम राबवला तर नक्कीच एटीएम व बँकेबाहेरील रांगा नक्कीच कमी होतील आणि याचा फायदा नक्कीच सामान्य नागरिकांना होणार आहे.