ठाणे : ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांचा बाहुबली अवतार आज ठाणेकरांना अनुभवता आला. काल रात्री पालिका उपायुक्त संदीप साळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनानं आज गावदेवी परिसरात फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षावाल्यांवर आज जोरदार कारवाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सुमारे 25 ते 30 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून मुजोर रिक्षावाल्यांच्या तक्रारीही आयुक्तांकडे येत होत्या. अशा मुजोर रिक्षाचालकांनाही आयुक्तांनी स्वत: चोप देत चांगलाच धडा शिकवला. यावेळी अवैध पार्किंग करणाऱ्या मोटर कारवरही करण्यात आली.  


अनधिकृत फेरीवाल्यांनीच काल पालिका उपायुक्तांना केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज ठाण्यात पहायला मिळाले. याबाबत सकाळी पालिकेत बैठक झाली, त्यात ठाणे १०० टक्के फेरीवाले मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानंतर दुपारी चार नंतर गावदेवी परिसरात एकविरा पोळीभाजी केंद्र आणि त्या परिसरातील सुमारे २५ ते ३० दुकानांना सील करत त्यांच्यावर तोडक कारवाई करण्यात आली. याच ठिकाणी काल माळवी यांना मारहाण करण्यात आली होती.


एवढ्यावर ही कारवाई थांबली नाही. मुजोर रिक्षा चालकही या कारवाईत लक्ष्य ठरले. पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी स्वत: या रिक्षावाल्यांना चोप दिला. या निमित्तानं संजीव जयस्वाल सिंघमच्या रुपात ठाणेकरांनी अनुभवले. यामुळे  सर्व-सामान्यांना दिलासा मिळाला असून, आयुक्तांच्या या कारवाईचं सर्वच स्तरातून स्वागत होतं आहे.