लातूर : एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वडिलांनीच आपल्या सख्या मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून त्याच्या हत्येची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील बोधे नगर  भागात राहणाऱ्या अमृत माणिक मुक्ता या २६ वर्षीय तरुणाची हत्या त्याचे वडील माणिक मुक्ता यांनीच घडवून आणल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. अमृत हा दारू पिऊन घरात धिंगाणा घालत होता. तसेच तो घरातील सदस्यांना मारहाण करीत असे. सतत समजावून देखील अमृत ऐकत नसल्यामुळे कम्पाऊंडर असलेले वडील माणिक मुक्ता यांनी अमृतचा काटा काढण्याची योजना आखली. 


त्यांनी मुलगा अमृतच्या हत्येची ४ लाख रुपयांना सुपारी दिली. अमृत मुक्ता हा २४ ऑक्टोबर रोजी बेपता झाला होता. या बाबत २६ तारखेस शिवाजीनगर पोलिसात तक्रार वडील माणिक मुक्ता यांनीच दिली. पोलिसांनी तपास केला असता त्याचा मृतदेह अहमदपूर येथे २८ ऑक्टोबर रोजी सापडला. अधिक तपास केला असता तीन जणांनी मिळून अमृतचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले.


त्या तीन खुन्यांना ताब्यात घेतले असता अमृतच्या खुनाची सुपारी त्याच्या वडिलांनी दिल्याचे पोलिसांना कबूल केले. दरम्यान वडिलांनीच मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.