सावंतवाडी : सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेच्या वेळी मालवण मतदारसंघात राणेंचा पराभव झाला असला तरी याठिकाणी विजयी झालेल्या वैभव नाईंकांबाबत नाराजी आहे आणि हीच नाराजी काँग्रेस किंबहुना राणेंच्या पथ्यावर पडण्याची शक्यताय. तिकडे वेंगुर्ल्यात गेल्या निवडणुकीत झालेला राडा सर्वश्रुत आहे. मात्र यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. याठिकाणी भाजपही आपली ताकद आजमावत आहे. राजन तेली आणि संदेश पारकर ही मंडळी आता काँग्रेसमधून भाजपात दाखल झालीय. साहजिकच युती होणार का हा खरा प्रश्न आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड ही नवी नगरपंचायत निर्माण झाली आहे. त्यामुळे देवगडची निवडणूकही अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे. देवगडमध्ये सद्यस्थितीत शिवसेनेपेक्षा भाजपचं पारडं जड आहे. मात्र अलीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीत काँगेसच्या नितेश राणेंनी बाजी मारलेली असल्यानं सेना भाजपला आव्हान असेल. 
जिल्ह्यात सध्या प्रमुख चारही पक्ष मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना- भाजपात अजूनही आलबेल नाही. सेना युती साठी आग्रही आहे मात्र भाजपाला युती नकोय. युतीमध्ये भाजपाला सन्मानजनक जागा मिळतील असं वाटत नसल्यामुळे भाजपला युती नकोय. साहजिकच ही मोट कशी बांधली जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सध्या जिल्ह्यातले राजकीय वातावरण तापलंय.  मात्र अजून युती आघाडी बाबत चर्चा प्रश्नार्थकच आहे. त्यात अलीकडे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असली तरी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांचं म्हणावं तसं सख्य नसल्यानं याचा फायदा घेण्याच्या स्थितीत विरोधक आहेत.