मुक्ताईनगर, जळगाव : महसूल मंत्री एकनाथ खडसे एमआयडीसी जमीन खरेदी वादात सापडल्याने त्यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ते थेट खासगी गाडीने जळगावात दाखल झालेत. यावेळी एका कार्यक्रमात ते म्हणालेत, चमत्काराशिवाय नमस्कार नाही, जोपर्यंत मुक्ताई माझ्या पाठिशी आहे, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला चक्क दांडी मारत मुक्ताई देवीचा सोहळ्याला उपस्थिती लावली. खडसे नाराज असल्याने त्यांनी थेट जळगाव गाठले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्यांना घ्यायला आलेल्या सरकारी गाडीचा त्यांनी त्याग केला. त्यामुळे चर्चेला उधाण आलेय. दरम्यान, खडसेंमुळे भाजप अडचणीत आल्याने त्यांचे मंत्रीपद काढून घेण्याची शक्यता अधिक आहे.


खडसेंचे मंत्रीपद जाण्याची शक्यता असल्याने खडसेंनी एक प्रकारे जळगावात येऊन इशारा दिल्याचे बोलले जात आहे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही, जोपर्यंत मुक्ताई माझ्या पाठिशी आहे, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. कॅबिनेटची बैठक काय, मंत्रिमंडळ काय आणि मंत्री काय, सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी आहे, असे सांगत ‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती...!’ असे अनेक अर्थांनी सूचक वक्तव्य  खडसे यांनी येथे केले.


लहानपणापासून पांडुरंगाच्या दिशेने जाणारा हा वारकरी आहे. केले ते जनतेसाठी केले आहे. माझा भार वाहण्यासाठी हे वारकरी बसले आहे. घालोनिया भार राहिलो निश्चिंती...! निरविली संती विठोबाची।’ या तुकाराम महाराजांच्या अभगांच्या ओळी सांगत त्यांनी आपणास कुठलीही चिंता नाही, भीती नाही. अनेक कावळे काव-काव करीत असल्याची टिप्पणी त्यांनी केली.


कोणी कितीही टिवटिव केली, कावकाव केली तरी मुक्ताईचा आशीर्वाद पाठीशी असल्याने आपण निश्चिंत आहोत. लहानपणापासून आपण मुक्ताई देवीच्या यात्रोत्सवास उपस्थित राहात आलो आहोत. त्यामुळे यंदाही देवीच्या सोहळ्यास उपस्थित आहे.