नाशिक : महानगर पालिकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बिग फाईट आणि चुरशीच्या लढती होत आहेत. निवडणुकीच्या मैदानात प्रभाग  क्रमांक १५ ची निवडणूक लक्षवेधी झाली आहे. माजी आमदार वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते यांना त्यांच्याच बालेकिल्यात तीन विद्यमान नगरसेवकांचं आव्हान आहे. त्यामुळे यानिमित्ताने अप्रत्यक्षरित्या वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 आणि 15 या दोन प्रभागातून केवळ तीन नगरसेवक महापालिकेत निवडले जाणार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 पहिल्यापासूनच चर्चेत आहे. मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आपलं बस्तान बसवणाऱ्या माजी आमदार वसंत गिते यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या या प्रभागात गिते यांचा मुलगा प्रथमेश गिते स्वतः निवडणूक लढवतोय. 


वसंत गिते मनसेत असताना त्यांचे समर्थक असलेल्या नगरसेवक संदीप लेनकर आणि गुलजार कोकणी या दोघा विद्यमान नगरसेवकांनीच गितेंना आव्हान दिले आहे. लेनकर मनसेकडूनच तर कोकणा काँग्रेसकडून रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक सचिन मराठेंनीही आव्हान निर्माण केले आहे.


चारही उमेदवार विजयाचा दावा करत आहेत. यात तीन विद्यमान नगरसेवकांचं आव्हान असल्याने गिते यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भाजपच्या तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका बजावणारे गिते आपल्या मुलाला निवडून आणतात की होमपिचवर नाशिककर त्यांची विकेट काढतात याकडे लक्ष लागले आहे.