ठाणे : ठाण्याच्या कासारवडवली भागात झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. या हत्याकांडात १४ जणांचा नाहक जीव गेला. हसनेनने आपल्याच कुटुंबियातील १४ जणांची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अद्याप या हत्येचे गूढ उकलेलेले नाही. या हत्येने मात्र संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरलीये. याचा परिणाम तेथील मुलांच्या लग्नावरही होतोय. या हत्याकांडामुळे या परिसरात मुलींचे लग्न लावून देण्यास वधूपित्यांनी नकार दिलाय. 


वरेकर यांच्या घराशेजारी राहणारा शैबाज याचा नुकताच साखरपुडा ठरला होता. तीन मार्चला त्याचा साखरपुडा होणार होता. यासाठी शैबाजच्या घरच्यांनी तयारीही सुरु केली होती. साखरपुड्यासाठीचे दागिनेही खरेदी करण्यात आले होते. मात्र एक मार्चला जेव्हा शैबाजचे वडील मुलीच्या घरी गेले तेव्हा मुलीकडच्यांनी या प्रस्तावास नकार दिला. ज्या भागात असे हत्याकांड घडले तेथे मला मुलगी द्यायची नाहीये असं मुलीच्या घरच्यांनी सांगितले. 


हे ऐकून शैबाजच्या घरच्यांना चांगलाच धक्का बसला. या हत्यांकाडानंतर मुलीकडच्यांनी शैबाजच्या घरच्यांशी नाते जोडण्यास नकार दिलाय. एरव्ही मुलाला व्यसन असेल त्याला चांगली नोकरी नसेल तर मुलीकडच्यांकडून नकार असतो. मात्र या हत्याकांडाच्या कारणामुळे शैबाजचे ठरलेले लग्न मोडले.