एप्रिलमध्येच पाणीटंचाई... तरुणाचा मृत्यू
पाणी टंचाईमुळे शहापूर तालुक्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. धक्कादायक म्हणजे एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची बिकट परिस्थिती उद्भवलीय.
ठाणे : पाणी टंचाईमुळे शहापूर तालुक्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. धक्कादायक म्हणजे एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची बिकट परिस्थिती उद्भवलीय.
दांड गावातील तुकाराम आगीवले असं मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी तरुणाचं नाव आहे. गावात पाणी नसल्याने दांडगावातील आदिवासी १० किमी अंतरावर असलेल्या आंबळे डोहात पाणी आणण्यासाठी जातात.
सोमवारी उन्हाच्या कडाक्यात तुकाराम पाणी आणण्यासाठी आंबळे डोहाकडे गेला होता. मात्र अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे डोहाजवळ पोहचल्यावर चक्कर येऊन तो पाण्यात पडला. तुकाराम दिसत नसल्याने ग्रामस्थांनी त्याची शोधाशोध केली. मात्र तुकाराम सापडला नाही.
सोमवारी शोधाशोध केल्यानंतरही तुकारामचा शोध काही लागला नाही. अखेर मंगळवारी तुकारामचा मृतदेह आंबळे डोहातल्या पाण्यात तरंगत असल्याचे आढळलं.
शहापूर परिसरातील विहीरी कोरड्या पडल्या असून टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी ग्रामस्थांनी वारंवार केलीय. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. येत्या दोन दिवसांत टँकर सुरु झाले नाही तर नाशिक मुंबई महामार्ग रोखण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय.