चेतन कोळस, येवला : पैठणी विणकरांच्या हितासाठी उभारलेले येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्र नेमके कुणाचे? असा सवाल आता विणकर करू लागले आहेत. पर्यटन विभागाने उभारलेल्या या केंद्रासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने पैठणी पर्यटन केंद्र आणि पैठणी क्लस्टर विणकरांच्या ताब्यात मिळावं, अशी मागणी जोर धरतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येवला... पैठणीसाठी प्रसिध्द असलेले हे शहर... इथे आजही विणकाम करत दीडशेहून अधिक कुटुंब आपली गुजराण करत आहेत. ही कला जोपासण्यासाठी तसेच वृद्धींगत करण्यासाठी शहरापासून जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीत ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्र उभारण्यात आले. राज्य पर्यटन विभाग आणि इतर विभागांकडून त्यासाठी कोट्यवधी खर्च झालेत. याच केंद्राशेजारी पैठणी क्लस्टर प्रा. लि या आमदार पंकज भुजबळांच्या कंपनीची इमारतही आहे. दोन वर्षांपूर्वी पैठणी पर्यटन केंद्राचे उद्घाटन झाले तेव्हापासून हे केंद्र केवळ व्यावसायिक तत्त्वावर काम करतंय. हा क्लस्टरचाच भाग असल्याचे आभास होतोय. त्यामुळे विणकरांसह सर्वांनाच पैठणी क्लस्टर कुणाचे आणि कुणासाठी? असा प्रश्न पडला आहे.


या केंद्राचे व्यवस्थापन नेमकं कुणाचं याबाबत संदिग्धता आहे. एका बाजूला मुंबईचं रा. रा. फाऊंडेशन तर दुसऱ्या बाजूला भुजबळ समर्थक हे व्यवस्थापन ताब्यात घेऊ पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथे आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आल्याचं पैठणी केंद्र व्यवस्थापक संजय विधाते यांनी स्पष्ट केलं.


छगन भुजबळ गजाआड असल्याने आता त्यांच्या समर्थकांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. पक्षात फूट पडली असली तरी कार्यकर्तेही संस्था ताब्यात घेण्यासाठी चाचपणी करतायत. मात्र केवळ विणकरांच्याच भल्यासाठी या केंद्राचा उपयोग होईल आणि राजकारण्यांची डाळ शिजणार नाही, याकडे सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे.