अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 
मागील काही वर्षात दिव्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळे इथल्या प्रभागांची संख्याही दोन वरून थेट अकरा वर पोहचली आहे. आणि लोकसंख्या वाढल्यामुळंच दिवा हे समस्यांचे माहेरघर बनलंय. अनधिकृत बांधकामांचं शहर, डम्पिंगचे शहर, रस्ते नसलेले शहर आणि सुरक्षा राम भरोसे असलेलं शहर म्हणजे दिवा... अशी दिवाची आजची ओळख बनलीय. या समस्यांकडे पूर्वी राजकीय पक्ष लक्ष देत नव्हते, मात्र आता प्रभाग वाढल्यानं या शहराचं राजकीय महत्त्व वाढलंय. कधी नव्हे ते दिवा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिवा शहराला फक्त भेट नाही तर आश्वासनांचा पाऊस पाडत दिवा स्वप्न दाखवलंय. तर काँग्रेस नेते नारायण राणेंनीही त्यांच्या ठाण्यातला प्रचाराचा शुभारंभ दिल्यातूनच केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर चक्क ठाण्यात सभाच घेणार नाही असं जाहीर करुन ठाण्याऐवजी दिव्यात सभा घेणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता विरोधकांनी मनसेवर चांगलंच तोंडसुख घेतलय.



तर याआधी दिव्यात राज्यातील मोठ्या नेत्यांपैकी एकमेव नेते राज ठाकरे यांनीच फक्त भेट दिली होती. आणि त्यांनी दिव्यात पुन्हा येऊन दिव्यातील अंधार दूर करणार असं राज ठाकरे बोलले होते. त्यामुळे त्यांनी दिव्याकडे मोर्चा वळवला. मनसेचे नेते मात्र ठाण्यात सभेकरता परवानगी मिळत नसल्याचा दावा करत आहेत. 


दिवा शहरात निवडणूक प्रचारासाठी का होईना मुख्यमंत्री आले. आम्हाला निवडून द्या दिवा शहराचा विकास करतो असं आश्वासन त्यांनी दिलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही दिव्यावरच भर दिलाय.  एकंदर भाजप काय मनसे काय आणि शिवसेना काय सर्वच पक्षांचा डोळा आहे तो दिव्यातील अकरा प्रभागांवर. एका पक्षाला एकगठ्ठा मतदान देण्याचा दिव्याचा इतिहास आहे. हा इतिहास यावेळी कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडतो ते २३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल.