`भाषणावेळी अश्रू ढाळण्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा`
भाषणावेळी भावनिक होऊन अश्रू ढाळण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
मुंबई : भाषणावेळी भावनिक होऊन अश्रू ढाळण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. तसंच नोटबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी देशाच्या जनतेला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, कारण या जनतेनंच त्यांना निवडून दिलं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
इंग्लंडमधल्या ब्रेक्झिट प्रमाणे नोटबंदीबाबतची जनमत चाचणी विरोधात गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
काळ्या पैशाप्रमाणे तुमच्या मनातही काही काळंबेरं तर नाही ना, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राज्यसभेतल्या भाषणाचं कौतुक केलं. मनमोहन सिंग यांची मतं गांभीर्यानं घ्यावीच लागतील असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं.