यवतमाळ विद्यार्थी लैंगिक शोषण प्रकरण : विजय दर्डा वादात
यवतमाळ पब्लिक स्कूलमधील १७ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक जेकब दास यांना अटक करण्यात आलीय. वडगाव पोलिसांनी ही कारवाई केलीय. दुसरीकडे संतप्त पालकांनी संस्थाचालक विजय दर्डा यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त केलाय.
श्रीकांत राऊत, यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमधील १७ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक जेकब दास यांना अटक करण्यात आलीय. वडगाव पोलिसांनी ही कारवाई केलीय. दुसरीकडे संतप्त पालकांनी संस्थाचालक विजय दर्डा यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त केलाय.
दर्डा विमानतळावरही आंदोलनावर दिसलेला हा यवतमाळकरांचा संताप आहे जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीविरोधात... हा एल्गार आहे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय दर्डा आणि यवतमाळ पब्लिक स्कूल विरोधातल्या दोन नराधम शिक्षकांविरोधात...
गेल्या तीन चार दिवसांपासून यवतमाळवासियांचा हा रोष पाहायला मिळतोय.. यवतमाळ पब्लिक स्कूलमधल्या यश बोरुंदीया आणि अमोल क्षीरसागर या शिक्षकांनी १७ मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला. यानंतर यवतमाळ शहरात संतापाची लाट उसळली.
दर्डांच्या घरावर मोर्चा
प्रकरण उघड झाल्यानंतर संस्थाचालक विजय दर्डा आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत यवतमाळवासिय रस्त्यावर उतरले होते... पालक आणि यवतमाळवासियांच्या या उद्रेकानंतर दोन्ही नराधम शिक्षकांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर संस्थाचालकांविरोधातही गुन्हा दाखल झाला. मात्र, यानंतरही पालक आणि यवतमाळच्या नागरिकांचा संताप कमी झालेला नाही. विजय दर्डा यांच्या घरावर मोर्चा नेत संचालकांवर कारवाईची मागणी केली... या प्रकरणी संस्थाचालक दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
याप्रकरणी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलंय. यवतमाळ पब्लिक स्कूलमधल्या मुलींच्या विनयभंगाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
यवतमाळवासियांचा संताप आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन यानंतर तरी या दोन नराधम शिक्षकांविरोधात कोणत्याही दबावाविना कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.