साध्वी प्रज्ञा सिंगची जामीन याचिका पुन्हा फेटाळली
एका विशेष एनआयए न्यायालयानं आज पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिची जामीन याचिका फेटाळून लावलीय.
मुंबई : एका विशेष एनआयए न्यायालयानं आज पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिची जामीन याचिका फेटाळून लावलीय.
उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रीय चौकशी समितीनं (एनआयए) गेल्याच महिन्यात साध्वी प्रज्ञा हिला क्लीन चिट दिली होती. तिच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्यानं एनआयएनं तिच्या जामीन याचिकेला विरोध दर्शवला नव्हता.
परंतु, विशेष न्यायाधीश एस डी टेकाळे यांनी बंद दरवाज्याआड झालेल्या सुनावणीत प्रज्ञा सिंगची ही जामीन याचिका फेटाळून लावलीय.
यापूर्वी केंद्रीय चौकशी समितीनं पुराव्यांचं कारण समोर करत १३ मे रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रज्ञा आणि इतर पाच जणांविरोधातील सर्व आरोप हटवले होते. यावेळी, स्फोटात जखमी झालेल्या निसार अहमद सय्याद बिलालनं हस्तक्षेप करत याचिका दाखल करून आरोपींच्या याचिकेचा विरोध केला होता.
मुस्लिमबहुल भाग असलेल्या मालेगावात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सात जण मारले गेले होते.