मुंबई : ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यानं अंगडियामार्फत चालणारे व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून ठप्प आहेत. यामुळं अंगडियांचं नुकसान होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत झवेरी बाजार, भुलेश्वर बाजार, काळबादेवी बाजार, ऑपेरा हाऊस डायमंड मार्केट तसच विविध वस्तूंची होलसेल मार्केट आहेत. इथं दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. देशभरातील व्यापारी एकमेकांशी व्यवहार करतात आणि हे सगळे आर्थिक व्यवहार होतात ते अंगडियांच्या म्हणजे माणसी पारंपरिक कुरियरच्या माध्यमातून.


मात्र मोदी सरकारनं ५०० आणि हजाराच्या नोटा बंद केल्यानं व्यापारच ठप्प आहे. मुंबईतील व्यापा-यांचे जवळपास ८० टक्के रोख व्यवहार बंद पडलेत... परिणामी व्यापा-यांसोबतच हातावर पोट असणा-या अंगडियांचं खूपच नुकसान होत आहे. एक अंगडिया दिवसाला दोन तीन व्यापा-यांचे एक ते दोन कोटी रुपयांचे व्यवहार करुन कमिशन पोटी किमान २० ते ३० हजार रुपये कमवतो. पण सध्या व्यवहारच थंडावल्यानं अंगडिया डोक्याला हात लावला आहे.


५०० आणि १००० च्या नोटा घ्यायला सध्या कुणीच तयार नाहीय. त्यामुळं आणखी आठवडाभर व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळं व्यापा-यांनाही देखील मोठा फटका बसतोय. देशातला काळा पैसा नष्ट करण्यासाठी आणि दाऊदसारख्या दहशतवाद्यांनी निर्माण केलेलं बनावट नोटांचं जाळं उद्धवस्त करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठ्या चलनाच्या सध्याच्या नोटा रद्द केल्या. पण नवीन नोटा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात तसंच बाजारात पैशांची रोलींग रहावी यासाठी केंद्र सरकारनं आधीच व्यवस्था का केली नाही? असा सवाल आता विचारला जातोय.