मुंबई : काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट्स मंगवारी रात्रीपासून दिसू लागले. सुट्टे पैशै नसल्यानं पेट्रोलपंपांवर गर्दी पाहायला मिळाली तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही व्यवहार ठप्प झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेऊन जनतेला मोठा धक्का दिला. निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असलं तरी आज दिवसभर या सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट बघयाला मिळाले,


साईड इफेक्ट्स


१. बँका आणि एटीएमवर शुकशुकाट


मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या. बँका आणि एटीएमही बंद होती. नेहमी वर्दळीचं ठिकाण असणाऱ्या एटीएम सेंटर्सवर शुकशुकाट बघयाला मिळाला.


२. टोलनाक्यांवर गर्दी


पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद झाल्याचा सर्वाधिक परिणाम टोल नाक्यांवर बघायला मिळाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे, मुंबईतला ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, पुणे सोलापूर मार्गावरच्या टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या.


३. सोन्याला नवी झळाळी


काल रात्रीपासून लोकांनी आपल्या घरातल्या 500 आणि 1000च्या नोटा घेऊन सराफी दुकानांवर गर्दी करायला सुरूवात केली. घाटकोपरमध्ये तर रात्री दुकानांमधली गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. आज सकाऴी जळगावातल्या सराफ बाजारात भाव ठरवण्यातच दोन तास गेले, बाजार 11 वाजता उघडला. त्यातही सोन्याचा भाव कालच्या भावापेक्षा तब्बल 2 हजार रुपये वाढलेला होता. इकडे मुंबईत रोख पैसे देऊन म्हणजे 500 आणि 1000च्या बंद झालेल्या नोटा देऊन सोनं चांदी खरेदी करायची असेल, तर एक तोळा सोन्याचा भाव, 45 हजाराच्या घरात होता. तर कार्ड किंवा 100च्या नोटा देऊन खरेदी होणार असेल तर सोनं 32 ते 33 हजाराच्या दरम्यान मिळत होतं. 


४. रिअल इस्टेट आणि ज्वेलरी कंपन्यांना फटका 


डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाकडे होणाऱ्या वाटचालीनं जगभरातले बाजार कोसळत होते. त्यात भारतीय सरकारनं काळ्या पैशावर सर्जिकल हल्ला केला. त्यामुळे रिअल इस्टेट आणि ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समधअये पडझड झाली. दुपारच्या सत्रात बाजारातील अनेक सेक्टर्समध्ये चांगली खरेदी झाली. पण रिअल इस्टेटच्या शेअर्समध्ये कुठलाही फारशी रिकव्हरी दिसली नाही. 


५. कृषीउत्पन्न बाजार समित्या ठप्प


कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सकाळपासूनच रोखीचे व्यवहार ठप्प झाले. त्य़ामुळे जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी व्यवहार दिवसभर ठप्प होते. 


६. नोटा खपवण्यासाठी झुंबड


पेट्रोलपंपावर अनेकांनी आपल्या नोटा देऊन पेट्रोल डिझेल गाड्यामध्ये भरून घेण्यासाठी झुंबड उडाली. पुण्यात नोटा खपण्याच्या उद्देशानं अनेकांनी पंपांवर गर्दी केली. पण पाचशे आणि हजाराच्या नोटा संपवायच्या असतील, तर पूर्ण किंमतीचं इंधन भरावं लागेल असा निर्बंध पेट्रोलपंप चालकांनी घातला. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.


एकूणच काय कायम काळा पैशाच्या कॅन्सर रोखण्यासाठी सुरू केलेल्या किमोथेरपीमुळे राज्यभरात त्याचे साईड इफेक्ट मात्र बघयाला मिळाले.