मुंबई : आजकाल सोशल मीडियाच्या ताकदीविषयी बरीच चर्चा केली जाते. याचा प्रत्यय नुकताच मुंबईत आला. गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर एअर इंडियांचं एक विमान बंगळुरूला जाण्यासाठी तयार होतं. मात्र विमान उड्डाणच करण्यास तयार नव्हतं. कारण, विमानाचं उड्डाण करण्यासाठी विमानात पायलटच नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशी रात्री ८.१५ च्या विमानात बसले. पण, विमानातील केबिन क्रूतर्फे घोषणा करण्यात आली की विमानासाठी कोणताही पायलट उपलब्ध नाही. कारण, डीजीसीएच्या नियमांनुसार पायलटना दिवसाला जितके तास पूर्ण करण्याची मुभा असते तितके तास जवळपास सर्व पायलटनी पूर्ण केले होते. हे ऐकून प्रवाशांना राग आला. 


विमानात बसलेल्या प्रवाशांनी पार पंतप्रधानांपासून ते डीजीसीएला ट्विटरवर टॅग केले आणि आपल्या समस्या मांडल्या. एकामागोमाग एक अशी जवळपास शेकडो प्रवाशांनी आपल्या तक्रारी मांडल्यावर अधिकाऱ्यांना जाग आली. नागरी उड्डाण आणि पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी एका प्रवाशाच्या ट्वीटला लगेच उत्तर दिलं. 


या तक्रारींची लगेच दखल घेऊन एअर इंडिया चेअरपर्सन अश्विनी लोहानींनी लगेचच एका पायलटची व्यवस्था केली आणि या विमानाने उड्डाण केले. पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या ताकदीचा प्रवाशांना अनुभव आला.