मुंबई : महापुरुष आणि गडकिल्ल्यांच्या नावांचा वापर हा 'आक्षेपार्ह' ठिकाणी करण्यात येऊ नये, अशी मागणी विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमारसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बियर बार, मांसाहारी खानावळ, परमिट रूम, देशी दारु विक्री तसंच लोकनाट्य कला केंद्र अशा ठिकाणांवर महापुरुष आणि गडकिल्ल्यांच्या नावांचा वापर करण्यात येतो... यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात... असं पंडित यांनी म्हटलंय. त्यामुळेच अशा ठिकाणांवरचे नावांचे बोर्ड काढून टाकावेत, अशी मागणी त्यांनी केलीय.


सरकारचं उत्तर...


पंडित यांच्या या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिअर बार, मद्य विक्री केंद्रांना महापुरुष आणि गडकिल्ले आणि देवदेवतांच्या नावाचे फलक लावण्यासाठी बंधन आणणारा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय. 


गुमस्ता आणि कामगार कायद्यांतर्गत हा विषय येत असल्यामुळे तातडीने यावर बंधन टाकता येणार नाही... कामगार विभाग, उत्पादन शुल्क विभाग तसंच दोन्ही सदनातल्या सदस्यांची या संदर्भात बैठक घेण्यात येईल तसंच विधी आणि न्याय विभागाचं मत मागवून कायदा तयार करण्यात येईल, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. 


शिवाय, डॉक्टर, टीचर्स अशा विदेशी मद्याच्या नावाला बंदी घालण्याबाबत अभ्यास करावा लागेल, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय.