`सेल्फी पॉईंट` वही बनाऐंगे - भाजप
ज्या ठिकाणी राज ठाकरेंच्या मनसेनं मुंबईतलं पहिला `सेल्फी पॉईंट` उभारला त्याच शिवाजी पार्क मैदानात आता भाजप आपला सेल्फी पॉईंट उभारणार आहे.
मुंबई : ज्या ठिकाणी राज ठाकरेंच्या मनसेनं मुंबईतलं पहिला 'सेल्फी पॉईंट' उभारला त्याच शिवाजी पार्क मैदानात आता भाजप आपला सेल्फी पॉईंट उभारणार आहे.
दादरच्या सेल्फी पॉईंटवरुन आता वाद सुरू झालेत. हा सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय संदीप देशपांडेंनी घेतलाय, त्यानंतर भाजपनं कुरघोडी करत पुढाकार घेतलाय. आता भाजप आणखी आकर्षक स्वरुपात सेल्फी पॉईंट करेल, असं ट्विट आशिष शेलारांनी केलंय, तर दुसरीकडे शिवाजी पार्कवरचा सेल्फी पॉईंट मनसेच पुन्हा सुरू करणार असल्याचा फलक राज ठाकरेंनी लावलाय.
शिवाजी पार्कमधला सेल्फी पॉईंट बंद करणं मनसेच्या चांगलंची जिव्हारी लागलंय. त्यानंतर राज ठाकरेंनी संदीप देशपांडेंशी चर्चा केली आणि देशपांडेंना सेल्फी पॉईंट सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत तर आता या सेल्फी पॉईंटसाठी भाजप सरसावलीय.
पराभवाचा पहिला घाव... सेल्फी पॉईंटवर
दादरमधल्या या सेल्फी पॉईंटनं अनेकांच्या सेल्फीची हौस भागवली... इथे अनेकांचे पावसाळे रोमॅन्टिक झाले... याच सेल्फी पॉईंटमुळे शिवाजी पार्कातली संध्याकाळ आणखी रंगीबेरंगी झाली... पण आता मनसेचा हा सेल्फी पॉईंट इतिहासजमा झाला. मुंबईतल्या पहिल्या वहिल्या सेल्फी पॉईंटचा गाशा गुंडाळण्यात आला.
दोन वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात मुंबईतला पहिला सेल्फी पॉईंट शिवाजी पार्कात तयार झाला... डोक्यावरच्या या रंगीत छत्र्यांनी अनेकांचे पावसाळे आणखी सुंदर केले होते...
मनसेच्या ताब्यातल्या या सेल्फी पॉईंटनं आता निरोप घेतल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये यासाठी स्पर्धा सुरू झाली... तरुणांच्या मनांमध्ये हक्काचं स्थान मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष हा सेल्फी पॉईंट मिळवण्यासाठी धडपड करत होते. त्यात आता भाजपनं बाजी मारलीय.