आशिष शेलार यांच्यावर पुन्हा मुंबई शहराची जबाबदारी
भाजपच्या मुंबई शहर अध्यक्षपदी पुन्हा एकदा आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
मुंबई : भाजपच्या मुंबई शहर अध्यक्षपदी पुन्हा एकदा आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर ११४ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपानं ठेवले आहे. दहिसरच्या भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी आज ही घोषणा केली. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात भाजपचा मेळावा झाला. यात चौधरी यांनी पक्षासमोर टार्गेट ठेवतानाच मित्रपक्ष शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. शेलार आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने चौधरी यांनी ही घोषणा केली आहे, हे विशेष.
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची फेरनियुक्ती केली जाण्याची शक्यता होती. तशी चर्चा होती. शेलार यांची निवड केल्यानंतर त्यांनी स्वबळाचा नारा ठोकला आहे. पक्षाने जी जबाबदारी सोपवली आहे, ती तुमच्यामुळे पूर्ण होईल. लोकसभेत जे यश मिळाले तसेच यश महापालिकेत मिळेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
महापालिकेत २२७ नगरसेवक निवडून जातात. भाजपाने ११४ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून आपलाच महापौर बसवण्याचं टार्गेट ठेवले आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते याकडे लक्ष लागले आहे.