आता मध्यरात्रीनंतरही धावणार बेस्ट बस
शेवटची लोकल मिस झाल्यानंतर आता मुंबईकरांना प्लॅटफॉर्मवर राहावं लागणार नाही.
मुंबई : शेवटची लोकल मिस झाल्यानंतर आता मुंबईकरांना प्लॅटफॉर्मवर राहावं लागणार नाही. मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी बेस्टनं रात्री 1 ते 4 यावेळेत अतिरिक्त 4 बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
पहिली बस रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी दादरहून सुटेल आणि तिचा शेवटचा थांबा गोराई असणार आहे. दुसरी बस 2 वाजून 25 मिनिटांनी दादर ते ओशिवरा धावेल. तिसरी बस रात्री अडीच वाजता दादरहून मुलुंडसाठी धावेल, तर चौथी बस पहाटे 4 वाजता दादरहून सुटून कोपरखैरणेपर्यंत धावेल.
फक्त बसेस सुरू करून बेस्ट प्रशासन थांबलं नाही तर महिलांच्या सुरक्षेचा विचार करता बसेसमध्ये सीसीटीव्हीही लावण्यात आले आहेत. या सेवेसाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. सेंट्रल आणि वेस्टर्न अशा दोन्ही मार्गांवर सध्या ही सेवा सुरू केलीय. एसी बसही सुरू केल्या जाणार आहेत आणि प्रवाशांचा प्रतिसाद पाहता बसची संख्याही वाढवली जाण्याची शक्यता आहे.