बेस्टचे `ते` बंद मार्ग सुरु, शिवसेनेचा महाव्यवस्थापकांना घेराव
शहरातील ५२ बस मार्ग बंद करण्याचा निर्णय घेणार्या बेस्ट प्रशासनाला शिवसेनेने जोरदार दणका दिला. त्यामुळे हे बंद मार्ग तीन दिवसांत पुन्हा सुरु होणार आहेत.
मुंबई : शहरातील ५२ बस मार्ग बंद करण्याचा निर्णय घेणार्या बेस्ट प्रशासनाला शिवसेनेने जोरदार दणका दिला. त्यामुळे हे बंद मार्ग तीन दिवसांत पुन्हा सुरु होणार आहेत.
बसमार्ग तीन दिवसांत सुरू
बंद बस मार्गविरोधात शिवसेना नगरसेवकांनी बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना सव्वा तास घेराव घातला. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या या आक्रमकतेपुढे बेस्ट प्रशासनाने नमले. त्याचवेळी ५२ बसमार्ग तीन दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाच महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी केली.
प्रवाशांना मोठा दिलासा
या नव्या निर्णयामुळे मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. बेस्ट प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी बेस्टचे ५२ बस मार्ग बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला बेस्ट समिती आणि महापालिका सभागृहात तीव्र विरोध करण्यात आला होता. महासभाही तहकूब करण्यात आली होती. मात्र तरीही बेस्ट प्रशासनाने बसमार्ग बंद केले.
शिवसेनेचा मोर्चा
शिवसेना सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट भवनवर मोर्चा नेऊन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबईकरांच्या हिताचेच निर्णय
दरम्यान, बेस्ट उपक्रम हा जनतेच्या सेवेचा उपक्रम आहे. त्यामुळे तिथे फायद्या-तोट्याचा विचार न करता यापुढेही मुंबईकरांच्या हिताचेच निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षाही महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केली.