मुख्यमंत्र्यांनी दिलेत भाजप-शिवसेना युतीचे संकेत
शिवसेनेबरोबर भाजपची युती होणार की नाही, या चर्चेवर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात केले. युतीबाबत सकारात्मक बोलणी सुरु आहेत, असे जाहीर प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले.
ठाणे : शिवसेनेबरोबर भाजपची युती होणार की नाही, या चर्चेवर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात केले. युतीबाबत सकारात्मक बोलणी सुरु आहेत, असे जाहीर प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले.
भाजप-शिवसेना युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील असे सष्ट करीत कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.दोन्ही पक्षात मतभेद जरुर आहेत. मात्र, दोन्ही पक्षांचे विचार हे वेगळे आहेत. त्यामुळे मतभेद असने हे स्वाभाविकच आहेत, अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
तसेच युतीचा निर्णय हा पारदर्शी कारभाराच्या आधारावरच घेतला जाईल, असे सांगत फडणवीस यांनी सेनेसोबतच्या युतीची शक्यता कायम असल्याचे संकेत दिलेत. शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत पण पारदर्शी कारभार करताना जी दिशा ठरवली आहे त्या दिशेने जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, ठाण्यात गुरूवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी एकला चलोचा नारा दिला. मात्र, पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा दिला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याबाबत सावध भूमिका घेताना दिसले. युतीची काळजी करु नका, सैनिकाचे काम लढाई करण्याचे, शत्रू कोण हे पाहू नका. शिवाजी महाराजांना सेनापती महत्त्वाचे होते, तसेच मावळेही, कारण प्रत्यक्ष लढाईत मावळेच उतरतात. कार्यकर्ता हा आपला मावळा आहे, हे समजून कामाला लागावे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.