दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपा शिवसेनेला साथ देताना विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला आहे. मागील वेळेस क्रमांक एकवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट चार क्रमांकावर फेकला गेला आहे, तर क्रमांक दोनवर असलेल्या काँग्रेसची घसरण क्रमांक तीनवर झाली आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्येच शाब्दिक युद्ध सुरू झालंय तर राष्ट्रवादी कांग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातील गडातच हादरा बसल्याने पक्षात अस्वस्थता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मागील १७ वर्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र आता या वर्चस्वाला धक्का लागायला सुरुवात झालीय. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पहिला धक्का बसला आहे. २०११ च्या नगरपालिका निवडणुकीत क्रमांक एक आणि दोनवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची या नगरपालिका निवडणुकीत मोठी घसरण झाली आहे. 
 
 २०११ साली सर्वाधिक 916 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एक वर होता. मात्र आताच्या १४७ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जागांमध्ये 287 ची घसरण होऊन त्यांचे ६२९ नगरसेवक निवडून आले आहेत. तर 19 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या नव्हे तर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातोय.


काँग्रेसचीही राष्ट्रवादी सारखीच अवस्था झाली असली तरी त्यांचे नुकसान राष्ट्रवादी पेक्षा कमी झालेले आहेत. २०११ च्या निवडणुकीत काँग्रेसचे 771 नगरसेवक निवडून आले होते आणि हा पक्ष दुसऱ्या स्थानावर होता. यावेळी यात घसरण 142 ची घसरण होऊन कांग्रेसचे 633 नगरसेवक निवडून आले आहेत. तर 23 ठिकाणी कांग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. एकेकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत क्रमांक एकवर असलेल्या या दोन्ही पक्षांना बसलेला हा फटका पक्ष नेत्यांची चिंता वाढवणारा आहे. 


मागील कितीतरी वर्ष स्थानिक स्तरावरील त्याच त्याच नेत्यांच्या राजकारणाला लोक कंटाळले होते. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रासारख्या अभेद बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका बसला आहे. विदर्भ आणि खानदेशात या दोन्ही पक्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे तर मराठवाड्यात दोन्ही पक्षांचे फारसे नुकसान झालेले नाही. मात्र एकूणच राज्यातील निकाल हा या दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरली असून आता दोन्ही पक्षात यावरून आत्मचिंतन सुरू झाले आहे.