२९ मार्चला सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेचा 2017-18 या वर्षीचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी, 29 मार्चला स्थायी समिती सभेत सादर केला जाणार आहे. दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार असून यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटी रूपयांनी कमी असणार आहे.
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेचा 2017-18 या वर्षीचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी, 29 मार्चला स्थायी समिती सभेत सादर केला जाणार आहे. दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार असून यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटी रूपयांनी कमी असणार आहे.
मागील वर्षी 2016-17 ला 37 हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आतापर्यंत अर्थसंकल्पाचा आकडा वाढला मात्र कमी झालेला नाही. अनेक प्रकल्पांसाठी मोठ्या रकमांची केवळ तरतूद करायची, परंतु ती रक्कम खर्चच होत नसायची. हा प्रकार यावेळच्या अर्थसंकल्पापासून बंद करण्यात आलाय. त्यामुळे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा सुमारे दहा हजार कोटी कमी करून सादर केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान हा अर्थसंकल्प पारदर्शक असावा आणि मुंबईकरांवर कोणतीही करवाढ नको अशी मागणी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलीय. पालिका आयुक्तांकडे पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.