मुंबईतल्या धोकादायक पुलांबाबत महापालिकेला माहितीच नाही
महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज्यातल्या सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सरकारनं दिलेत
मुंबई : महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज्यातल्या सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सरकारनं दिलेत, पण मुंबई महापालिकेच्या पूल विभागाकडे जुन्या पुलांची माहितीच नाही, अशी धक्कादायक माहिती झी 24 तासच्या हाती आली आहे.
कोणते ब्रिज किती वर्षं जुने आहेत, ते कोणी बांधले, त्यांची सध्याची स्थिती कशी आहे, त्यातले धोकादायक पूल कोणते, अशी कोणतीही माहिती मुंबई महापालिकेकडं नाही. महापालिकेचे मुख्य अभियंते कोरी यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
पुलांबाबतची माहिती शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्याच जुलै महिन्यात खास टेंडर काढलं आहे. येत्या आठ महिन्यात ही कंपनी पुलांची माहिती गोळा करून महापालिकेला देणार आहे. त्यासाठी 2 कोटी 18 लाख रूपयांचं कंत्राट या कंपनीला देण्यात आलं आहे.