चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक
उत्तर मुंबईत गेल्या काही महिन्यापासून उच्छाद घालणाऱ्या चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. बोरीवलीत पहाटे दरोड्याच्या प्रयत्नात असताना हे गुंड आणि मुंबई पोलीस यांच्यात धुमश्चक्री झाली. त्यातच हे चौघे पोलिसांच्या हाती लागले.
मुंबई : उत्तर मुंबईत गेल्या काही महिन्यापासून उच्छाद घालणाऱ्या चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. बोरीवलीत पहाटे दरोड्याच्या प्रयत्नात असताना हे गुंड आणि मुंबई पोलीस यांच्यात धुमश्चक्री झाली. त्यातच हे चौघे पोलिसांच्या हाती लागले.
पहाटे तीन पासून सुरू झालेल्या या चकमकीदरम्यान दरोडेखोरांनी पोलिसांवर देशी कट्ट्याने गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झालाय. बोरिवलीच्या शिंपोली भागात आज पहाटे चड्डी बनियान गॅंगच्या दरोडेखोरांनी एका वृद्ध दाम्प्त्यांच्या घरी दरोडा घातला.
दरोडेखोरांनी वृद्ध दाम्प्त्याला अमानुष मारहाण केलीये. त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना हिंदुजा हॉस्पिटलला दाखल करण्यात आलय. दरम्यान, त्यावेळी आजूबाजूच्या लोकांना दरोड्याची चाहूल लागली. त्यांनी पोलिसांशी संपर्क केल्यावर काही मिनिटातच घटनास्थळी हजर झाले. त्यांनी दरोडेखोरांना पकडण्यास पुढे जाताच दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला.
त्यानंतर पोलीस आणि चड्डी बनियान गॅंगमध्ये चकमक सुरु झाली. याच चड्डी बनियान गॅंगने काल पहाटे कांदिवली येथे दरोडा टाकला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. गेल्या २-३ महिन्यांपासून राज्यभरात या चड्डी बनियान गॅंगने १०० पेक्षा जास्त दरोडे घातलेत.
१०-१२ जणांची हत्या आणि ५० पेक्षा जास्त जणांना या गॅंगने गंभीर जखमी केलय. तर दरोडा टाकताना अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या चड्डी बनियान गॅंगच्या दरोडेखोरांना जिवंत अटक केल्याने अनेक दरोड्यांची उकल होईल असं सांगितल जातयं.