मुंबई  : भाजप आणि शिवसेनेमध्ये डिनर डिप्लोमसी दिसून येत आहे. उद्या सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल झालेत. ते डिनरसाठी मातोश्रीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात  भेट होत आहे. असे असले तरी यामागे वेगळेच राजकारण असल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे सत्तेत राहूनही भाजपला टार्गेट करण्याची संधी सोडत नाही. सातत्याने शिवसेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे. सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. विरोधक अधिक आक्रमक झालेले दिसत आहेत. अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. तर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधक आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही भेट असू शकते, अशी राजकीय चर्चा आहे.


दरम्यान, राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार टाकत  सैराट सरकारचा झिंगाट कारभार झाल्याचा राधाकृष्ण विखे-पाटल यांचा हल्लाबोल दिसून आला.  विरोधक अजूनही सैराटमध्येच अडकलेले, असा मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला. मात्र, विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची संधी सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.


दरम्यान, अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार हत्याप्रकरण गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांना यावर आवाज उठवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टकीरकण पत्रकार परिषदेत दिले. कोपर्डीप्रकरणी जातीपातीचं राजकारण होऊ देणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचीही माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली. 


तर दुसरीकडे दस-यापर्यंत परिमार्जन करा, असा इशारा नाराज विनायक मेटेनी भाजप सरकारला दिलाय. आमच्या विश्वासाला तडा दिला गेलाय, असे म्हणत मेटे यांनी तोंडसुख घेतले. तर भाजप-शिवसेना सरकारमध्ये अनेक मंत्र्यांवर घोटाळा, गैरव्यवहार, गुन्हे दाखल आदी आरोप आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून याच्यात अधिक भर पडू नये, अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव यांच्या  भेटीला गेल्याचे बोलले जात आहे.