मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर यांच्या निषेधार्थ विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर यांच्या निषेधार्थ विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला.
विरोधकांचा गोंधळ सुरु असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायची नाही का, असा संतप्त सवाल विरोधकांना केला.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत भुजबळ यांच्या संदर्भात विधानसभेत चर्चा करावी यासाठी स्थगन प्रस्ताव दिला मात्र अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करतांना विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. 'राज्यात भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई झाली पाहिजे. ईडीने पुराव्यानिशी भुजबळ यांच्यावर कारवाई केली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायची नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.