मुंबई : कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधिमंडळात गोंधळ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर विरोधकांची बैठक पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. विरोधकांनी केलेली संघर्ष यात्रा मंगळवारी संपली. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने शेतकऱ्यांनाना कर्जमाफी जाहीर केली. हा मुद्दा उचलून विरोधक सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. 


विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधक या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा गोंधळ घालण्याची शक्यता आहे. विरोधकांना शिवसेनेची साथ मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदारदेखील विधानसभेत याच मुद्यावरुन सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना आमदारांच्या बैठकीत भूमिका ठरवण्यात येईल.


अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या आमदार विरोधकांसह आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे आजचा अधिवेशनाचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.