मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना म्हटलं आहे, "कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना नागरिकांनी पकडले, पोलिसांनी नाही आणि मुख्यमंत्री कोपर्डीला गेले नाहीत, परंतु मातोश्रीवर मेजवाणीसाठी गेले".


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदेत कोपर्डी बलात्कार प्रकरणावर चर्चा झाली. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, ‘आरोपींना नागरिकांनी पकडले आहे. गुन्हा नोंदविण्यास पोलिसांना उशिर का झाला. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कोपर्डी बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केवळ ट्विट केले. 


मुख्यमंत्री कोपर्डीला गेले नाहीत परंतु मातोश्रीवर मेजवाणी घेण्यास गेले. गावाकडची घटना म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. वाघाच्या जबड्यात हात घालू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरोपीचा हात तरी पकडायचा होता. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या.‘


मुंडे म्हणाले, ‘महिला शेतावर जायला घाबरत आहेत, सध्या नगरमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तुमच्या आरोग्य मंत्र्यांच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग केला, त्याच्यावर काय कारवाई केली? आताच विचार करा, अन्यथा 15 वर्षांनी आलेली सत्ता जायला वेळ लागणार नाही. चार महिन्याच्या आता कोपर्डी बलात्काराचा निकाल लावा, नराधमांना भररस्त्यात फाशी द्या.‘


कोपर्डी येथील घटना गंभीर आहे, त्यामुळे भावनिक झालो, मन दुखावले असेल तर माफी मागतो, असेही शेवटी मुंडे म्हणाले.