मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक जवळ येतेय, तशी सोशल मीडियावर देखील जोरदार लढाई सुरू झालीय. कोणत्या राजकीय पक्षाचं कॅम्पेन किती आकर्षक आहे, याची चर्चा सुरू झालीय. यानिमित्तानं मुंबईत सर्वत्र बॅनरबाजीही रंगलीय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Did you know? तुम्हाला माहित होतं का? हे कॅम्पेन सुरु केलंय शिवसेनेनं... गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची कॅचलाइन होती... 'करून दाखवले'... यंदाच्या वर्षी शिवसेना मुंबईकरांना विचारतेय 'डिड यू नो?' शिवसेनेनं जी कामं केली, ती तुम्हाला माहिती होती का? असा सवाल करत शिवसेनेनं प्रचार सुरू केलाय. मुंबईभर शिवसेनेनं तसे बॅनर लावलेत.



शिवसेनेच्या या कॅम्पेनवर आता विरोधी गोटातूनही प्रतिहल्ले चढवले जाताना दिसत आहेत. मनसेनं शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी do you know? yes we know अशी मोहीम हाती घेतलीय. पालिकेनं 182 कोटी रूपये कसे खड्ड्यात घातले, त्याचे फोटो मनसेकडून दाखवले जात आहेत. हे फोटो फेसबुकवर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना शेअर केले जात आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील शिवसेनेवर खड्डे आणि टॅब घोटाळ्याचे आरोप करत, you should know असं प्रत्युत्तर दिलं होतं. 


सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी सध्या भर देतायत ते सोशल मिडियावर... राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह वापरून अनेक कलाकृती व्हायरल केल्या जातायत. प्रत्येक राजकीय पक्षानं मतदारांचे छोटे छोटे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलेत. या सोशल मीडियावरील लढाईसाठी शेकडो राजकीय कार्यकर्त्यांची फौज दिवसरात्र राबतेय.


निवडणूक जवळ आली की आम्ही किती कामे केली हे सांगायला सत्ताधारी विसरत नाहीत तर सत्ताधाऱ्यांनी किती घोटाळे केले याची आठवण करुन द्यायला विरोधक विसरत नाहीत. पण राजकीय पक्ष हे मात्र विसरतात की ये पब्लिक है ये सब जानती है...