मुंबई : गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील बाबा मकदूम शाह माहीम दर्गा येथे देशात पहिल्यांदाच दर्गा परिसरात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे, असा दावा शिवसेना उपनेते हाजी अराफत शेख यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख, ट्रस्टी सोहेल खंडवाणी, रिझवान मर्चंट यांच्यासह मुस्लीम धर्मातील दिग्गज मौलाना-धर्मगुरू यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम पार पडणार असून हेच असुदुद्धीन ओवैसी यांना देशाभिमानी मुस्लिमांचे उत्तर असल्याचं हाजी अरफात शेख यांनी म्हटलंय.


'भारत माता की जय' म्हणण्यावरुन वादग्रस्त विधान केलेले 'एमआयएम'चे असदुद्दिन ओवैसी यांच्या वक्तव्याचा शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख यांनी खरपूस समाचार घेतलाय. 'मरणानंतरही ज्या मातीच्या कुशीत विसावा घेणार आहोत ती भूमी, तो देश आम्हाला आईसमानच आहे. त्यामुळे 'भारतमाता की जय' हा जयघोष शरमेने नव्हे तर गर्वाने म्हटलं पाहिज' असही शेख म्हणाले.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झेंडावंदन करणार असल्याचं समजतंय. याप्रसंगी पोलिसांचे एक पथक बँड सादर करणार आहे. झेंडावंदन करुन 'भारत माता की जय'चा जयघोषही होणार आहे. बुधवारी 'भारत माता की जय'वरुन झालेला राडा आता रस्त्यांवरही येणार असल्याची चिन्ह आहेत.


एमआयएमचे नेते असउद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी 'भारत माता की जय म्हणणार नाही' असं म्हटलं होतं. खासदार जावेद अख्तर यांनीही राज्यसभेत ओवैसींवर टीकास्त्र सोडलं होतं. सामनामधून केलेल्या घणाघाती टीकेनंतर आता शिवसेना विविध मार्गांद्वारे ओवैसींवर टीका करण्याच्या प्रयत्नात आहे.