दीपक भातुसे, मुंबई : एकनाथ खडसेंवर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला. खडसेंचा राजीनामा हा कुणाचा विजय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील महिनाभर एकनाथ खडसेंवर आरोपांच्या फैरी सुरू होत्या. या आरोपांमुळे वैयक्तिक खडसेंची जशी बदनामी होत होती, तशी सरकारची आणि भाजपाचीही बदनामी होत होती. त्यामुळे अखेर पक्षाने खडसेंचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला. आता खडसेंच्या राजीनाम्यानंतर हा विजय कुणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे. 


एकनाथ खडसेंविरोधात पुण्यातील एमआयडीसीच्या जमिनीचे प्रकरण बाहेर काढणारे हेमंत गावंडे, मंत्रालयात गजानन पाटील याला लाच घेतांना पकडून देणारे डॉ. रमेश जाधव, खडसेंविरोधातील इतर प्रकरणांबाबत आरोप करणाऱ्या अंजली दमानिया, या प्रकरणात खडसेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकणारे विरोधी पक्ष काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हा विजय आहे. तसा हा विजय शिवसेनेचाही आहे. 


शिवसेना-भाजपाची युती तोडण्यात खडसेंची भूमिका महत्त्वाची आहे. युती तोडण्याची घोषणाही खडसेंनी केली होती. याचा राग शिवसेनेच्या मनात होताच. याचीच संधी साधून एमआयडीसी जमीन प्रकरणी ही जमीन एमआयडीसीच्या मालकीचीच असल्याचा दावा शिवसेनेचे असलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करून खडसेंसमोरील अडचणी वाढवल्या होत्या. शिवसेना एवढ्यावरच थांबली नाही. सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे खडसेंचा राजीनामा हा शिवसेनेचाही विजय मानला जातोय. 


दुसरीकडे हा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. २०१४ साली भाजपाची सत्ता राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर राज्यात ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसे यांचा दावा होता. मात्र खडसेंना डावलून पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले आहे. पक्षाने उघडपणे मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त करत संघर्ष सुरू केला.


मुख्यमंत्र्यांनीही मग संधी मिळेल तिथे खडसेंना राजकीय शह देण्याचा प्रयत्न सुरू केला. अगदी खडसेंच्या खात्याचे सचिवही त्यांच्याशी चर्चा न करता नेमले जाऊ लागेल. यातून खडसे आणि मुख्यमंत्री संघर्ष वाढतच गेला. त्यातच खडसेंवर गंभीर आरोप होऊ लागले आणि मग या आरोपांबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला. या अहवालानंतरच पक्षश्रेष्ठींनी खडसेंचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यामागे त्यांच्या सर्व विरोधकांचा मग त्यात पक्षाबाहेरील आणि पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे.