`भाजपची ताकद पाहता 60 जागाही जास्त`
मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलंय.
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलंय. मुंबईत भाजपसाठी त्यांची ताकद पाहाता 60 जागाही जास्त आहेत असं मत शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपपुढे हा मोठ्या सन्मानाचा प्रस्ताव ठेवलाय असं राऊत म्हणाले. लहान पक्षांना जागा वाढवून देण्यासाठी सर्वांना पटेल असं कारण द्यावं लागेल अशी खिल्लीही त्यांनी उडवलीय.
भाजपबरोबर शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये भाजपचा 114 जागांचा प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला आणि भाजपला 60 जागांचा प्रस्ताव दिला. शिवसेनेच्या या प्रस्तावामुळे युतीतल्या जागावाटपाची चर्चा फिस्कटली होती.
आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची युतीसंदर्भातल्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान युतीबद्दल माझ्याकडे भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलंय. ज्यावेळी तो प्रस्ताव येईल तेव्हा आशा-निराशा असा खेळ खेळण्यासाठी वेळ राहिलेला नाही, जो काय निर्णय असेल तो आम्ही घेऊ, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय.