मुंबई : भाजप खासदार गोपळ शेट्टी यांचं 'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' हे वक्तव्य धक्कादायक आणि निषेधार्थ असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी शेट्टींच्या वक्तव्याचा प्रदेश काँग्रेसच्यावतीनं जाहीर निषेध केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेट्टी यांच्या वक्तव्याचा रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे विरोध करणार असल्याचंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. दुष्काळाच्या तीव्र परिस्थितीत शेतक-यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरु असल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सध्या फॅशन झालीय, असे वादग्रस्त विधान गोपळ शेट्टी यांनी केलं होतं. यावर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतलीय. 


इकडे महाराष्ट्रातही भाजपचे नेते मुक्ताफळं उधळताना दिसतायत. शेतकरी आत्महत्या ही एक फॅशन झालीए, असं धक्कादायक विधान भाजप खासदार गोपळ शेट्टी यांनी केलंय. राज्यात जानेवारीपासून १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सर्वच शेतकऱ्यांच्या हत्या या नापिकीमुळे होत नाहीयेत. तर आत्महत्या करण्याचं फॅड आलंय, अशी शब्दांत शेट्टी यांनी बळीराजाचा अपमान केलाय.


काल मुंबईत बोरिवलीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची वेगवेगळ्या राज्यांमध्येही स्पर्धा लागल्याचं अजब विधान शेट्टी यांनी केलंय. त्यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांनंतर टीका होऊ लागताच शेट्टी यांनी सारवासारव सुरू केलीये. आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.