मुंबई :  अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी, महापौरपदाच्या स्पर्धेतून भाजपने बिनशर्त माघार घेतली असली, तरी आपणच स्थायी समितीत बसणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात मिळालेल्या आश्वासनांमुळे गीता गवळी यांच्याकडे सर्वांचेच लक्ष होतं. गीता गवळींनी यावरून आपली भूमिका मांडताना स्थायी समितीत आपल्याला नक्की स्थान मिळणार, असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेसोबत गवळी परिवाराचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंचा मी नेहमी आदर करते. त्यामुळे शिवसेनेसोबत मी आधीपासूनच होते, आणि आताही असणार आहे, असं गीता गवळी शिवसेनेला पाठिंबा देणार का या प्रश्नाचं उत्तर देतांना म्हणाल्या, याशिवाय शिवसेनेकडून बोलावणं आलं, तर आपण चर्चेसाठी तयार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.


मुंबईत उपलोकायुक्तांची नेमणूक होणार, त्यामुळे मुंबईकरांचंच भलं होईल', अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केलीय, मुंबईत नेमण्यात येणाऱ्या उपलोकायुक्त पदाच्या निर्णयाचंही त्यांनी यावेळी स्वागत केलं आहे.


भाजपचा माघार घेण्याचा निर्णय योग्यच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मारलेला हा सिक्सर आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. शिवाय मुख्यमंत्र्यांनी स्थायी समिती सदस्यपदाबाबत जो शब्द दिला आहे, तो ते नक्की पाळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती करायला त्या विसरल्या नाहीत.