मुंबई : 'जिहाद'च्या नावाखाली हिंसेचं समर्थन कराणारा आणि 'आयसिस'मध्ये भरतीसाठी तरुणांची डोकी भडकावणारा झाकीर नाईक याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  दरम्यान, नाईक जर स्वतःहून भारतात आले नाहीत, तर प्रत्यर्पण करून भारतात आणले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादग्रस्त भाषणांमुळे चर्चेत आलेला धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्यावरचा अहवाल मुंबई पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्रालयाला सोपवला आहे. या ७२ पानी अहवालात झाकीर नाईकशी संबंधित असंख्य बाबींचा खुलासा करण्यात आला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाकीरची भाषा धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि भडकाऊ असल्याचं या अहवालात म्हटले आहे.


अहवालात पाहा काय नमुद केलेय?


- झाकीर अन्य धर्मियांच्या विरोधात पूर्वग्रह दुषित करतो. 
- कुराण वगळता अन्य धर्मग्रंथ खोटे असल्याचं तो आपल्या भाषणात सांगतो. 
- झाकीरच्या विधानांमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. 
- त्याच्या मते इस्लामच सर्वोच्च आहे. अन्य सगळे धर्म बिनकामाचे. 
- आपल्या भाषणांमधून त्यानं धर्मांतराला फूस दिली आहे.
- दहशतवादाचं समर्थन करत मुस्लिम युवकांना भडकवण्याचं काम त्यानं केले आहे.
- जिहादच्या नावाखाली हिंसेला त्याचं समर्थन आहे.
- महाराष्ट्रामध्ये त्याच्या भाषणांवर बंदी आणावी अशी शिफारस
- झाकीरची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला मिळणाऱ्या परकीय देणग्यांची चौकशी केंद्रीय गृहमंत्रालय करत आहे. राज्याची आर्थिक गुन्हे शाखाही याबाबत तपास करतेय. 
- गणपती, शंकर या हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह विधानं केल्याबद्दल झाकीरवर मुंबईत कुर्ला पोलिसांमध्ये गुन्हा दाखल 
- याखेरीज सावंतवाडी, वेंगुर्ला तसंच राज्याबाहेरही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. 
- सकृतदर्शनी झाकीरची विधानं दहशतवादी आणि त्यांच्या कारवायांचं समर्थन करणारी आहेत. 
- IRFचा गेस्ट मॅनेजर अर्शी कुरेशी रिझवान खानच्या मदतीनं केरळमध्ये धर्मांतर आणि ISISसाठी भरती करण्यासाठी काम करत असल्याचंही या अहवालात समोर 
- अशफाकचे वडील अब्दुल माजिद यांनी अशफाकला ISISमध्ये सामील होण्यासाठी भडकवल्याची तक्रार नागपाडा पोलिसांमध्ये दिलीये... 


IRFनं हे सर्व आरोप फेटाळलेत. डॉक्टर झाकीर नाईक शांती आणि बंधुत्वाचाच प्रचार करतात, असा या संस्थेचा दावा आहे. गृहमंत्रालय किंवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं झाकीरच्या वकिलांनी सांगितले आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते अहवालातल्या मुद्द्यांच्या आधारे UAPA कायद्यांतर्गत झाकीरभोवती पाश आवळला जाऊ शकतो. 


ढाक्यामध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर झाकीर नाईक चर्चेत आला. झाकीरच्या भाषणांमुळे आपल्याला या हल्ल्याची प्रेरणा मिळाली, असं पकडलेल्या एका अतिरेक्याने सांगितले आहे.