कामत यांचा संन्यासाने मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी, समर्थकांचे चेंबूरमध्ये आंदोलन
गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील दुफळी उघड झालेय. कामत समर्थकांनी चेंबूरमध्ये आंदोलन केले.
मुंबई : ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील दुफळी उघड झालेय. कामत समर्थकांनी चेंबूरमध्ये आंदोलन केले. तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा धक्का मानला जातोय.
समाजकार्य सुरूच ठेवणार
दरम्यान, राजकारणातून संन्यास घेतलेला असला, तरी पक्षाच्या नावाशिवाय समाजकार्य सुरूच ठेवणार असल्याचं काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गुरूदास कामत यांनी स्पष्ट केलंय. कामत यांनी सोमवारी राजकारणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केले होते.
पक्ष श्रेष्ठींकडून दखल नाही !
पक्ष श्रेष्ठींना पाठवलेल्या पत्राची कुठलीही दखल श्रेष्ठीकडून घेतली जात नसल्याच्या उद्वेगातून त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याचे पुढे आलेय. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
अपेक्षाभंग झाल्याने नाराजी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नवीन महासचिवांबद्दल निर्णय घेणार आहेत. सध्याच्या महासचिवांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. त्यातच विधान परिषद उमेदवारी प्रकरणी कामतांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे नाराज गुरुदास कामतांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय.