मुंबई : होळीच्या आधीच मुंबापुरीत उन्हाचे चटके वाढायला लागलेत. रविवारी सूर्याच्या प्रकोपामुळे पारा 39.9 अंशांवर जाऊन पोहचला. पुढचे दोन दिवस उन्हाचा तडखा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. उत्तरेकडून वाहणार्‍या कोरड्या वार्‍यांचा जोर वाढल्याने पुढील काही दिवस मुंबईसह राज्यात ही उष्ण लहर कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्चचा पहिलाच आठवडा उकाडा घेऊन उगवला. पहिल्याच आठवड्यात मुंबईचे तापमान 33 अंशावर गेले. उत्तरेकडून वाहणार्‍या कोरड्या वार्‍यांनी त्यात भर घातली आणि तापमान आणखी वाढत गेलं. शनिवारी मुंबई 36.5 अंशांवर होती. त्यात रविवारी आणखी भर पडली. हे तापमान मार्च महिन्यातील सरासरी तापमानापेक्षा चार अंशांनी जास्त असल्याचं  हवामान खात्यानं म्हटलंय. 


उर्वरित राज्यातही मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले.