चौपाटीवर फिरायला येण्यास नकार दिल्याने पत्नीला अमानुष मारहाण
चौपाटीला फिरायला येण्यास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला अमानुष मारहाण केली. घटनेला महिना उलटल्यानंतरही या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
प्रविण नलावडे, झी मीडिया, नालासोपारा : चौपाटीला फिरायला येण्यास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला अमानुष मारहाण केली. घटनेला महिना उलटल्यानंतरही या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
नालासोपा-यात राहणारा आरोपी अशरफ हा रिक्षाचालक असून त्याला चार मुली आणि एक मुलगा आहे. चार एप्रिलला अशरफ रात्री अडीचच्या सुमारास घरी आला. यावेळी जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र अचानक पहाटे चारच्या सुमारास मुलांना घरी ठेवून मुंबईत चौपाटीला चल असं अशरफनं पत्नीला सांगितलं.
मात्र एवढ्या पहाटे चौपाटीला कशासाठी असं म्हणत तिनं त्याला नकार दिला. यामुळं संतापलेल्या अशरफनं कपडे धुण्याच्या धुपाटण्याने अमानुष मारहाण केली. यांत राबियाच्या डोक्याला, तोंडावर मारहाण जबर जखमा झाल्या. या प्रकरणाची राबियानं नालासोपारा पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र महिन्याभरानंतरही पतीला अटक झाली नसल्याने तिनं न्यायाची मागणी केलीय.
पोलीस सहकार्य करत नसल्याने राबियानं समाजसेविकेची मदत घेतलीय. या प्रकरणी राबियाला मारहाण करणा-या अशरफला अटक करण्याची मागणी जोर धरतेय. तर अशरफला लवकरच पकडू असं पोलीस सांगतायत.
आजच्या कुटुंब व्यवस्थेत दिवसेंदिवस विकृती निर्माण होत आहे. केवळ पत्नी चौपाटीवर फिरायला आली नाही म्हणून तिला अमानुष मारहाण केल्यानं समाजातील विदारक चित्र समोर आलंय.