तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या मदतीसाठी `मातोश्रीवर`
महापालिकेच्या निकालानंतर आता भाजप आणि शिवसेनेत चुरस लागलीय ती सत्ता स्थापन करण्यासाठी... आज दुपारी तिसऱ्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकानं उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी `मातोश्री` गाठालंय.
मुंबई : महापालिकेच्या निकालानंतर आता भाजप आणि शिवसेनेत चुरस लागलीय ती सत्ता स्थापन करण्यासाठी... आज दुपारी तिसऱ्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकानं उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री' गाठालंय.
प्रभाग क्रमांक 62 मधील अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी शिवसेनेशी संधान साधलंय. आज, मुलतानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आपण शिवसेनेलाच पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.
उल्लेखनीय म्हणजे, शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांना जोगेश्वरी प्रभाग क्र 62 मध्ये अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांच्यासमोर हार पत्कारावी लागलीय.
निकालानंतर शिवसेनेत प्रवेशासाठी उत्सुक असलेले मुलतानी हे तिसरे अपक्ष नगरसेवक आहेत. याआधी शिवसेनेतून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या स्नेहल मोरे आणि तुळशीराम शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय.
मुलतानी यांच्या पाठिंब्यानंतर सेनेचं संख्याबळ 86 होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सेनेला 114 जागांची आवश्यकता आहे.