किशोरी आमोणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांना आज, मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला.
मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांना आज, मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून किशोरी आमोणकर यांची प्रकृती बिघडली. किरकोळ आजाराचे निमित्त झाले आणि त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
विविध क्षेत्रातील मंडळींनी किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याचे सांगून किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, शिवराजसिंग चौहान, ममता बॅनर्जी, सुरेश प्रभू यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
भारतीय संगीताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे गाणे अजरामर राहील, अशा शब्दांत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी श्रद्धांजली वाहिली. त्याआधी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी संगीत क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
सरकारने पद्मभूषण (१९८७) आणि पद्मविभूषण (२००२) या पुरस्कारांनी किशोरीताईंना गौरविले होते. ‘स्वरार्थ रमणी राग सिद्धांत’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. शास्त्रीय संगीतात किशोरीताईंनी अनेक प्रयोग केलेच, सोबत त्यांच्या भावगीत आणि भजनांनीही रसिकांना स्वरसंस्कारित केले.
‘अवघा रंग एक झाला’, ‘मी माझे मोहित’, ‘जनी जाय पाणियासी’ हे त्यांचे अभंग, तसेच ‘म्हारो प्रणाम’ ही मीरेची भजने लोकप्रिय होती. ‘जाईन विचारीत रानफुला’, ‘हे श्यामसुंदरा.. ’ ही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली गाणीही गाजली.
‘गीत गाया पत्थरोने’ (१९६४) या हिंदी चित्रपटात त्यांनी प्रथम पार्श्वगायन केले. दृष्टी (१९९०) हा त्यांनी संगीत दिलेला पहिला हिंदी चित्रपट होता.