मुंबई : कॉमेडीयन स्टार कपिल शर्माच्या या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी खोचक पद्धतीने मुख्यमंत्र्यांना काही सवाल केलेत. ट्विटची दखल घेतली जाते, मात्र रितसर तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, ही भाजपची निती आहे, असे काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्माकडे मुंबई महापालिका अधिकाऱ्याने लाच मागितल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ट्विटरद्वारे उत्तर दिलेय. कपिल शर्मा याला त्याचे मुंबईतील कार्यालय उभारण्यासाठी आवश्‍यक त्या परवानग्यांसाठी एका महापालिका अधिकाऱ्याने पाच लाख रुपयांची लाच घेतल्याची तक्रार त्यांनी ट्विटरद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. 


मुख्यमंत्र्यांचे ट्विट


मुख्यमंत्र्यानी ट्विट करताना म्हटले, ‘कपिलभाई, कृपया संपूर्ण माहिती द्या. महापालिकेला कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही दोषींना सोडणार नाहीत.' शर्मा यांनी या प्रकरणावरून नाराज होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'हेच का तुमचे अच्छे दिन?' असा प्रश्‍नही ट्‌विटरवर विचारला. त्यानंतर तात्काळ सूत्रे कामाला लागली.



अधिकृत तक्रार करा : महापालिका


दरम्यान, मुंबई महापालिकेने अधिकृत तक्रार दाखल करा, असे आवाहन केले आहे. तर पालिका दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनीही यासंदर्भात निवेदन दिले आहे. महापालिका कुठलाही भ्रष्टाचार खपवून घेत नाही. भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. याबाबत कारवाई करणे शक्‍य व्हावे यासाठी कपिल शर्मा यांनी लाच मागणाऱ्याचे नाव द्यावे, अशी त्यांना विनंती केली.




सायबर सेलमध्ये तक्रार करणार : राम कदम


कपिल शर्मा यांनी सोशल मीडियावर व्यक्त होण्याऐवजी योग्य ठिकाणी तक्रार करायला हवी होती. त्यांनी किती प्राप्तिकर भरला हा मुद्दा होऊ शकत नाही, असे म्हणत कपिल शर्मावर रोष व्यक्त केला. जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्याने पैसे मागितल्यानंतरच त्यांनी तक्रार करायला हवी होती. नंतर सोशल मीडियावर बोलण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे एक सामान्य नागरिक म्हणून आता मीच पोलीस ठाण्यात जाऊन सायबर सेलमध्ये तक्रार करणार असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले.