किनन - रुबेन हत्येप्रकरणी चारही दोषींना जन्मठेप
मुंबईत २०११ मध्ये किनन आणि रुबेन यांच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरविले.
मुंबई : मुंबईत २०११ मध्ये किनन आणि रुबेन यांच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरविले. या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कधी घटना घडली होती?
आरोपी सुनील, सतीश, दीपक आणि जितेंद्र राणा यांनी २०११ साली किनन आणि रुबेन या दोन तरुणांची हत्या केली होती. अंधेरीतील अंबोली रेस्टॉरंटमध्ये आपल्या मैत्रिणीची छेड काढणाऱ्या या चौघांना किनन सँतोज(२४) आणि रुबेन फर्नांडिस(२८) यांनी विरोध केला होता. त्यानंतर बाचाबाची झाली प्रकरण हाणामारीवर गेले.
भर रस्त्यात भोसकून हत्या
किनन आणि रुबेन यांच्या मैत्रिणीची छेड काढणाऱ्या चौघांनी भर रस्त्यात चाकूने भोसकून त्या दोघांची हत्या केली होती. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
२८ साक्षीदारांची साक्ष
याप्रकरणी आज सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत चारही जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली. एकूण २८ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली होती. यामधील पाच जण घटनास्थळी उपस्थित होते, अशी माहिती मीडियाला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
छेड आणि विनयभंग
साक्षीदारांमध्ये किनन आणि रुबेन यांच्या दोन पिडीत मैत्रिणींचाही समावेश होता. त्यामुळे आरोपी छेड काढण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ठोस पुरावे न्यायालयाला मिळाले, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.