मुंबई : शहारातील प्रसिद्ध हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा पदार्फाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रुग्णालयातील ५ डॉक्टरांसह सीईओ यांना अटक करण्यात आली आहे. यात एका मेडिकल अधिकाऱ्याचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किडनी तस्करीत हिरानंदानी रुग्णालयाचे नाव समोर आले होते. मात्र, हिरानंदानी रुग्णालयात किडनी विक्री होत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पण कोणताही पुरावा नसल्याने कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी आज सहा जणांना अटक केली आणि हिरानंदानी हॉस्पीटलचे भांडेफोड केले.


हे आहेत डॉक्टर


अटक करण्यात आलेले पाच डॉक्टर हे हिरानंदानी रुग्णालयात कार्यरत होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुजित चटर्जी, वैद्यकिय संचालक अनुराग नाईक, डॉ. प्रकाश शेटे, डॉ. मुकेश शेटे, डॉ. मुकेश शहा आणि प्रकाश शेट्टी यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात मूत्रपिंड विकले जात असल्याचा प्रकार पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता.


याआधी यांना अटक


दरम्यान, याआधी विजेंद्र बिसेन (४२), भरत शर्मा (४८), इक्बाल महमद मोहम्मद सिद्दिकी (३५) आणि किसान ब्रिज किशोर जयस्वाल(२८) या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मुंबईत उघडकीस आलेल्या किडनी रॅकेटने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 


त्याआधी अकोल्यातील किडनी तस्करी समोर आल्यानंतर राज्यव्यापी तपासाला वेग प्राप्त आला होता. पोलिसांच्या तपासात या तस्करीची पाळेमुळे मुंबई आणि पुण्यात असल्याचेही उघड झाले होते. मुंबईतील मोठया तीन रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया घडल्याचे तपासात उघड झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता किडनी तस्करीत हिरानंदानी रुग्णालयाचे नाव समोर आल्याने रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


अशी माहिती पुढे आली!


हिरानंदानी रुग्णालयात किडनी विक्रीचे प्रकार सुरू असल्याची माहिती समाजसेवक महेश तन्ना यांनी पवई पोलिसांना दिली होती. बऱ्याच वर्षांपासून मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या ब्रिजकिशोर जयस्वाल यांच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ते काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल झाले होते. जयस्वाल या गरजू रुग्णाला किडनी देण्यासाठी बनावट दस्तावेज तयार करून किडनी प्रत्यारोपणाचे व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकांनी हालचाल सुरू केली. त्यानंतर प्रत्यारोपण होणार त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून रुग्णालयातील हा प्रकार उघडकीस आणला.