मुंबई : मुंबई लोकल ट्रेनच्या छतावरुन स्टंटबाजी करणं धोकादायक आहे, याची जाणीव रेल्वे प्रशासन सतत करुन देत असतं. मात्र त्याचा काहीच परिणाम होत नसल्याचं दिसून येत आहे. ठाण्यातल्या अशाच एका माथेफिरु स्टंटबाजाचा व्हीडिओ झी मीडियाच्या हाती आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी संध्याकाळी मुंब्रा इथून सुटलेल्या एका ट्रेनच्या छतावर चढून एक तरुण जीवघेणे स्टंट करत होता. समोरुन रेल्वेला वीज पुरवठा करणाऱ्या खांबाचे ब्लॉक आले की त्यांना धावत्या ट्रेनमध्येच चुकवण्याचा त्याचा हा आततायी स्टंट. एक दोन वेळा नाही तर सतत वेगानं येणाऱ्या वीज पुरवठ्याचे खांब चुकवत या स्टंटबाजाचा हा स्टंट सुरुच होता. 


स्वतःच्या जीवावर बेतणाऱ्या या फाजील स्टंटची किंमत किती महागात पडेल, याची त्याला पूर्ण कल्पना आहेच. मात्र अंगातली रग जीरविण्याकरताचा त्याचा हा आचरट आणि तितकाच चीड आणणारा असाच हा प्रकार आहे. कदाचित या आततायी स्टंटचा जबर फटका बसल्यानंतरच, असे माथेफिरु स्टंटबाज ताळ्यावर येत असावेत. त्यामुळे अशा वेडेपणाची नक्कल कोणीही करु नये असे आवाहन, झी मीडिया करत आहे.