एटीएमसमोर आजही पैशांसाठी लोकांच्या रांगा
मुंबईत तापमानाचा पारा वाढत असताना मुंबईकरांना पुन्हा एकदा एटीएम मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आलीय. कारण मुंबईतल्या बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे.
मुंबई : मुंबईत तापमानाचा पारा वाढत असताना मुंबईकरांना पुन्हा एकदा एटीएम मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आलीय. कारण मुंबईतल्या बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
एटीएममध्ये पैसेच नसल्याचं चित्र पुण्यातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे एटीएमबाहेर रांगा लाऊनही पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नसल्यानं, पुणेकर चिंतेत आहेत. मोठ्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही हेच चित्र पाहायला मिळतंय.
जालना शहरातल्या बहुतांश एटीएम मशीनमध्ये दोन दिवसांपासून खडखडाट आहे. त्यामुळे पैसे उपलब्ध असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरीकांनी गर्दी केलेली पाहायला मिळतेय. दरम्यान बँकांना पुरवण्यात येणारी रोकड मर्यादा घटवल्यानं अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. पण रोकड मर्यादा घटवली नसल्याचा खुलासा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधीच केलाय.
नोटाबंदीनंतर नोटांची टंचाई निर्माण झाल्याने कॅशलेस व्यवहारांकडे नागरिकांचा कल होता. मात्र पुरेशी रोकड उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळले. त्यामुळे कॅसलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी एटीएममध्ये कमी चलन पुरवठा करण्यात येत असावा अशी शक्याताही वर्तवण्यात येतेय.