मुंबई : हजारो किलोमीटरचा प्रवास करुन सायबेरीयाहून थेट मुंबईत सीगल हे पक्षी येतात. पण याच सीगल पक्ष्यांना मुंबईकर खाऊ घालत असलेल्या खाद्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. समुद्रकिनाऱ्यावर या पक्ष्यांना खायला घालणाऱ्या गांठीया, फाफडा, शेवेमुळे चक्क कुपोषणाचा धोका निर्माण झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या किनाऱ्यावर वावरणाऱ्या सीगल पक्ष्यांचं मनोहारी दृश्यं नवीन नाही... गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि समुद्र किनाऱ्यावर सीगल पक्षी दिसतात. दरवर्षी थंडीचा मौसम आल्यावर मुंबईच्या किनाऱ्यावर हे सीगल हजर होतात. हजारो किलोमीटरची भ्रमंती करुन आलेले हे पाहुणे पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करतात. पण त्याचवेळी उत्साहाच्या भरात मुंबईकर त्याच सीगलला पाहण्यासाठी गाठिया, फाफडा, शेव यांसारखे खाद्यपदार्थ खायला देतात.


पण पक्ष्यांच्या प्रेमाच्या नादात हे आततायी कृत्य आता सीगलना प्राणघातक ठरतंय. अशा प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट हे पक्ष्यांचे खाणे नाही. या खाद्यात प्रोटीन आणि पोषक तत्वांची कमतरता असल्याने हे पर्यटक पक्षी कुपोषणाची शिकार होतायत. त्याचप्रमाणे पक्ष्यांची पचनसंस्थेवर आणि श्वसनसंस्थेवर वाईट परिणाम होताना दिसतायत. अशाच प्रकारचे खाद्य वारंवार खायला दिल्यास पक्ष्यांच्या जीवावर बेतू शकते, असं अॅनीमल बोर्ड़ आफ इंडियाचे सदस्य डॉ. जे सी खन्ना यांनी म्हटलंय. 


सीगल पक्ष्यांचा मुक्काम हा डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. केवळ सी गलच नाही तर अन्यही पक्षी किनाऱ्यावर दाखल झालेत. पण काही अतिहौशी पक्षीप्रेमींमुळे किनाऱ्यावरील पाहुण्यांचा मुक्काम मात्र धोक्यात आलाय.