मुंबई : नवऱ्याशी भांडण झाल्याने घरातून बाहेर पडून रेल्वे स्थानकावर एकट्या बसलेल्या महिलेला विश्वासात घेत, शीतपेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याची घटना माहीम येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल जावेद रफिक शेख ३३ याला अंधेरी येथून अटक केली आहे.  त्याला न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


फोनवर झालं नवऱ्याशी भांडण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांताक्रूझ परिसरात राहणारी २९ वर्षीय पीडित महिला नवऱ्याशी वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळली होती. २० मे शुक्रवारी ती मशिद बंदर येथे खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी घरी परतताना नवऱ्याशी फोनवर भांडण झाल्याने हताश झालेली ही महिला सायंकाळी ७च्या सुमारास माहीम स्थानकावर एकटीच बसली होती. त्यावेळी आरोपी अब्दुल याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत जवळीक साधली. 


नोकरी देतो सांगितली...


आरोपी अब्दुल हा एसीच्या सर्व्हिगचे काम करतो. महिलेला विश्वासात घेत अब्दुलने तिला चांगली नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच रात्री झाली असून तिला स्थानकाजवळील सत्कार हॉटेलमध्ये थांबण्यास विनंती केली. अब्दुलवर विश्वास ठेवून महिला हॉटेलवर गेली. तेथे अब्दुलने शीतपेयातून महिलेला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केला आणि पोलिस पकडतील म्हणून मध्यरात्रीच हॉटेलमधून पळ काढला.


सीसीटीव्हीमुळे सापडला...


दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर महिलेने पोलिसाकडे दाद मागितली. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अब्दुलला सय्यद अलीचाळ, जे.पी.मार्ग अंधेरी येथून अटक केली.